कपडे पांढरे पण धंदे काळे !

 "त्या" मटका माफियांवर पोलीस प्रशासन मेहरबान ; कार्यवाही कधी ?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली ; पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष



जालना/ (द बातमीवाला ): जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मटका जुगार पुन्हा बोकाळला असून, स्थानिक पोलिसांची त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. मटका माफिया आणि पोलीस यांच्यातील ‘सख्य’ असल्याचा संशय स्थानिक नागरिकांमध्ये बळावत चालला आहे. मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असूनही प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप केला जात आहे.

 स्थानिक मटका माफिया राम भावराजी लांडे याच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही, त्याच्यावर कार्यवाही होत नाही. उलट, लांडे याचा प्रभाव राजकीय वर्तुळातही दिसून येतो. तो ठाकरे गटाच्या युवासेनेचा उपजिल्हाप्रमुख असल्याने त्याला राजकीय वरदहस्त मिळाला आहे. दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी अंबड पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीदरम्यान, लोकआत्मा न्युज चॅनलचे पत्रकार तरंग लक्ष्मणराव कांबळे बातमी संकलनासाठी पोहोचले होते. यावेळी मटका माफिया राम लांडे याने कांबळे यांना “तू माझी बातमी छापली आहेस, तुला ठार मारीन,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कांबळे यांनी त्वरित प्रभारी अधिकारी सिद्धार्थ बरवाल यांना माहिती दिली. त्यांनी फक्त एनसी नोंदवून कारवाईचे आश्वासन दिले, पण पुढील कार्यवाही केली नाही.घटनेनंतर कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी विशाल खांबे व जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले, तरीही पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. राम भावराजी लांडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून, त्याने अवैध मार्गाने बेहिशोबी संपत्ती जमवली आहे. याची ईडीमार्फत चौकशी करून कठोर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे लांडे याचा आत्मविश्वास वाढला असून, तो उघडपणे धमक्या देत आहे.

पत्रकाराचा न्यायासाठी लढा

तरंग कांबळे यांनी मटका माफियाविरोधात सतत पाठपुरावा केला आहे. त्यांनी त्यांच्या व कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचे सांगून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच, मटका माफियांवर कठोर कारवाई करावी आणि त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह...

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांमध्ये रोष आहे. मटका जुगारामुळे समाजाचे मोठे नुकसान होत असताना, पोलिसांचा अशा गुन्हेगारांना अभय देण्याचा प्रकार चिंतेचा विषय बनला आहे. आता प्रशासन कठोर पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Post a Comment

0 Comments