POLICE ALERT: चिखलीत पोलिसांचा 'फास्ट ट्रॅक' तपास! वायर चोर आणि भंगार विक्रेता जेरबंद !

शेतकऱ्यांच्या ३२ हजारांच्या वायर चोरीचा पर्दाफाश ; भंगार विक्रेत्यासह चोरट्या अटकेत

चिखली पोलिसांची 'केबल ऑपरेशन' यशस्वी !



चिखली/(छोटू कांबळे ) – चिखली तालुक्यातील तांबुळवाडी शिवारात बळीराजाच्या शेतातील मोटार पंपचे वायर चोरी झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर चिखली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (डि.बी. पथक) केवळ काही तासांत आरोपींना अटक करत धडक कारवाई केली. या कारवाईत चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि. ८ जुलै २०२५ रोजी अभियान कुमार सहदेव निकाळजे (वय ४० वर्ष, व्यवसाय अभियंता, रा. वार्ड क्रमांक २३, राजे संभाजीनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या भावजयीच्या नावे असलेल्या तांबुळवाडी शिवारातील शेतात असलेल्या बोअरवेलवर लावलेला मोटारपंप व त्याला जोडलेली सुमारे २५० फूट श्री कोअर केबल वायर (किंमत अंदाजे ₹५,०००) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याशिवाय आसपासच्या आणखी ९ शेतकऱ्यांच्या शेतांतील बोअरवेल व विहिरींवरून एकूण १३७५ फूट वायर चोरीस गेल्याची माहिती मिळाली. या सर्व चोऱ्यांचा एकत्रित मुद्देमाल सुमारे ₹३२,५०० एवढा होता. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात अप.क्र. ५२६/२०२५, कलम ३०३(२) भादंवि अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी डि.बी. पथकाचे पो.उपनिरीक्षक समाधान वडणे यांच्याकडे सोपविण्यात आली.

पोलिसांची तत्पर कारवाई 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार पो.नि. संग्राम पाटील यांनी डि.बी. पथकाला तत्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली व स्थानिक माहितीगारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राहील अरुण इंगोले या संशयितास ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान त्याने दोन अल्पवयीन मुलांसह सदर चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेल्या वायर अज्ञात ठिकाणी जाळून त्यातील तांब्याचे तारे चिखली येथील भंगार विक्रेता अजीम यास विकल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी भंगार विक्रेता शे. अजीम शे. नजीर यालाही ताब्यात घेऊन त्याच्या दुकानात झडती घेतली. तेव्हा १७ किलो ५०० ग्रॅम वजनाचे जाळलेल्या तांब्याचे वेगवेगळ्या गोलाकार गोळे मिळून आले, ज्याची किंमत सुमारे ₹१७,५०० इतकी आहे.

अटक व पुढील तपास

सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी –

  1. राहील अरुण इंगोले (रा. चिखली)
  2. शे. अजीम शे. नजीर (भंगार विक्रेता, रा. चिखली)

यांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी भंगार दुकानातून चोरीचा काही मुद्देमाल देखील जप्त केला आहे. पुढील तपास सुरु असून चोरीस वापरण्यात आलेली साधने, अल्पवयीन सहकारी व अन्य गुन्ह्यांबाबत तपास सुरु आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधिक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत डि.बी. पथकाचे पो.उपनि. समाधान वडणे, सफौ. राजेंद्र काळे (ब.नं. ९०२), पोहेका विजय किटे (ब.नं. २०७२), पोना. अमोल गवई (ब.नं. २२६१), पोका. प्रशांत धंदर (ब.नं. ५८१), पंढरीनाथ मिसाळ (ब.नं. १२१६), निलेश सावळे (ब.नं. १३४७), राहुल पायघन (ब.नं. २५७०) आणि महिला पोलीस कर्मचारी रुपाली उगले (ब.नं. २४१८) यांनी सक्रिय सहभाग घेतला.शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांची ही जलद कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे.

Post a Comment

0 Comments