🔴 BREAKING NEWS : न.प. चिखलीच्या सभागृहाचे दरवाजे पत्रकारांसाठी उघडणार का ?

न.प. चिखलीच्या सर्व सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश देण्याची काँग्रेस नगरसेवक भाईजान यांची मागणी 

 पारदर्शकतेसाठी नगरसेवकाची ठाम भूमिका



चिखली/(छोटू कांबळे/द बातमीवाला) – चिखली नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा व विविध समिती सभांमध्ये चिखली शहरातील पत्रकार बांधवांना प्रवेश देण्यात यावा, अशी ठाम मागणी काँग्रेसचे नगरसेवक तथा प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक भाईजान उर्फ उबेद अली खान यांनी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्याकडे आज दि. 10 फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
  चिखली नगरपालिकेमध्ये आयोजित होणाऱ्या विविध सभांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांमुळे शहराचा विकास, नागरी सुविधा, निधीवाटप व प्रशासनाची कार्यपद्धती थेट जनतेशी संबंधित असते. मात्र, सध्या पत्रकारांना सभागृहात प्रवेश न मिळाल्यामुळे या निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होत आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभा व राज्य विधानसभेत पत्रकारांना थेट प्रवेश देण्यात येतो. त्याच धर्तीवर चिखली नगरपालिकेतील किमान ५ ते १० पत्रकारांना रोटेशन पद्धतीने सभांमध्ये प्रवेश देण्यात यावा. प्रत्यक्ष प्रवेश शक्य नसल्यास, सर्व सभा सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारित कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल, नागरिकांना अचूक माहिती मिळेल आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करीत आहेत, हे जनतेसमोर स्पष्ट होईल, असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.
या मागणीमुळे चिखली नगरपालिकेच्या प्रशासनावर पारदर्शकतेसाठी दबाव वाढला असून, मुख्याधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments