आ. श्वेताताई महाले पाटील यांना जीवे मारण्याची पत्राद्वारे धमकी
संतप्त भाजपा कार्यकर्ते दाखल करणार चिखली पोलिसांकडे तक्रार
चिखली /( छोटू कांबळे ) : चिखली मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाचे नेतृत्व करणाऱ्या आणि सर्व समाजघटकांमध्ये एकात्मता निर्माण करणाऱ्या लोकप्रिय आमदार मा. सौ. श्वेताताई महाले पाटील यांना काल दिनांक २० फेब्रुवारी रोजी जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने कारवाईची मागणी होत आहे.
सदर प्रकाराने समाजकंटकांचा बुरखा फाटावा आणि अशा कृत्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी श्वेताताईंचे समर्थक आज दिनांक २१ फेब्रुवारी दुपारी २ वाजता त्यांच्या चिखली येथील निवासस्थानी एकत्र येणार आहेत. यानंतर चिखली पोलीस स्टेशनमध्ये या धमकीच्या पत्रासंदर्भात अधिकृत तक्रार नोंदवली जाणार आहे. आमदार श्वेताताई महाले पाटील या सुरक्षित असून त्यांच्या समर्थकांच्या शुभेच्छा आणि जगदंबेच्या आशीर्वादामुळे त्या कोणत्याही अडचणीतून सावरतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकारामुळे मतदारसंघातील वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी सर्वस्तरांतून होत आहे. या घटनेचा तपास सुरू असून लवकरच दोषींवर कारवाई होईल, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्याचे प्रकरण ताजेच असताना व या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील असल्याचे उघड झाले असताना ; आमदार श्वेताताई महाले यांना आलेली जीवे मारण्याची धमकी पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत असून यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आमदार महाले यांचे समर्थक करत आहेत.
0 Comments