चिखलीत चक्काजाम..!

चिखलीत हिंदू समाजाचा आक्रमक पवित्रा ; आमदार श्वेताताई महाले पाटील यांना जीवे मारण्याच्या धमकीच्या निषेधार्थ चक्काजाम !



चिखली /( छोटू कांबळे ): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर चिखलीतील  हिंदू समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये भाजपा कार्यकर्ते व हिंदू बांधवांनी तक्रार अर्ज सादर केला असून, या धमकीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू बांधवांनी व भाजप कार्यकर्त्यांनी खामगाव चौफुलीवर चक्काजाम केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

चक्काजाम नंतर वाहतूक पूर्वपदावर

आज, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेल्या या चक्काजाममुळे तब्बल अर्धा ते एक तास वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. खामगाव चौफुलीवरील मुख्य रस्त्यांवर वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले, मात्र आंदोलन संपल्यानंतरच वाहतूक पूर्वपदावर आली.


भाजपच्या नेत्यांनी आणि हिंदू बांधवांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत दोषींना तत्काळ अटक न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. चिखलीतील या घटनेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली असून, जनतेत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, स्थानिक जनतेमध्ये आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये या प्रकरणामुळे रोष कायम आहे.

Post a Comment

0 Comments