सातही मतदारसंघात उत्साहात मतदान ; 23 नोव्हेंबरला मतमोजणी
जेष्ठ व दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत केले मतदान
बुलढाणा/ (जिमाका): जिल्ह्यातील सातही मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी सात वाजतापासूनच मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाले. मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद देत सातही मतदारसंघात प्राप्त आकडेवारीनुसार अंदाजे सरासरी 70.35 टक्के मतदानाची नोंद झाली.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
मतदानाची विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम टक्केवारी याप्रमाणे : मलकापूर विधानसभा मतदारसंघात 70.75, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 62.15, चिखली विधानसभा मतदारसंघात 71.68, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 70.05, मेहकर विधानसभा मतदारसंघात 68.80, खामगांव विधानसभा मतदारसंघात 76, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 73.02 असे अंदाजे एकूण 70.35 टक्के सरासरी मतदान झाले.
लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणूकीत मतदान करताना बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मतदारसंघात उत्सवात मतदारराजाने सक्रीय सहभाग घेत मतदान केले. मतदानाला ग्रामीण भागात तर शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावत भरभरुन प्रतिसाद मिळाला. मतदारा ने मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त प्रमाणात करुन प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली. दिलेल्या या प्रतिसादामुळे जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा माहिती कार्यालयाच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. येथील मतदान केंद्रावरील सोईसुविधाविषयी माहिती जाणून घेतली.
जिल्हा प्रशासनाने यावेळी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत उत्साहात मतदान केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला व दिव्यांग मतदान केंद्र स्थापित करण्यात आले होते. तसेच युवासाठी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी सहा मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. तसेच मतदान केंद्रावर दिव्यांगांकरिता सक्षम ॲपच्या माध्यमातून व्हीलचेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदान यादी, पिण्याचे पाणी, दिव्यांग व जेष्ठ व्यक्तींसाठी व्हीलचेअर, सावलीचा मंडप, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह आदी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती.
0 Comments