बिबट्याच्या भीतीने गाव थरथरतंय, प्रशासनाच्या कारवाईचा पत्ता नाही
बिबट्याच्या हल्ल्याने पशुपालक हवालदिल
चिखली ( छोटू कांबळे) – चिखली तालुक्यातील पांढरदेव गावात बिबट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, गेल्या आठ दिवसांत दोन गायींची शिकार करण्यात आली आहे. यामुळे गावकरी भीतीच्या सावटाखाली आहेत. आज, दि. 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी विश्वास काकफळे यांच्या शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार मारले.
विश्वास काकफळे हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी कष्टाने जमवलेल्या पैशातून गाय खरेदी केली होती. बिबट्याने गाय ठार मारल्याने त्यांचे सुमारे २५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. या आधी आठवडा भरापूर्वी देविदास म्हस्के यांच्या गायीवरही बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते. त्यावेळी महसूल, वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला होता व अहवाल शासनाकडे कार्यवाहीसाठी पाठवला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. गावकऱ्यांनी बिबट्याच्या शोधासाठी ट्रॅप लावून त्याला पकडण्याची मागणी केली आहे. गावात सध्या भीतीचे वातावरण आहे. शेतकरी वर्गातून रात्री ९ वाजता लाईट सुरू करण्याची मागणीही होत आहे, कारण सध्या ती रात्री ११ वाजता दिली जाते, जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त व योग्य प्रकाशयोजना केली जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांचा संयम सुटू शकतो, अशी चिन्हे दिसून येत आहेत. या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली असून, जर लवकरच उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
0 Comments