चिखली पंचायत समितीतील सिंचन विहीर घोटाळ्याचा पर्दाफाश ; मागील तारखेत काढलेल्या आदेशांवरून बीडीओंचे कारस्थान उघड
चिखली /( द बातमीवाला ) : चिखली पंचायत समितीतील सिंचन विहीर वाटप घोटाळ्याचा भांडाफोड शेतकरी नेते विनायक सरनाईक आणि देविदास कणखर यांनी केला असून, बीडीओ माधवराव पायघन यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यस्तरावर पंचायत समितीचे नाव बदनाम झाले आहे. इसोली गावातील लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रमाला डावलून मागील तारखेत आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आंदोलनातून उघडकीस आला प्रकार
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात आंदोलन करत बीडीओं विरोधात तक्रार केली. यामध्ये इसोली गावातील उर्वरित शेतकऱ्यांचे प्राधान्यक्रम डावलून ठराव क्रमांक ६ चा प्रस्ताव त्रुटी म्हणून बाद करण्यात आल्याचे समोर आले होते तर इतर १० प्रस्तावाचे स्थळ पाहणी आदेश का करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित केला होता. बीडीओंनी २ जानेवारी २०२५ रोजी तारखेत स्थळ पाहणी आदेश काढून, ठरावातील वरील प्राधान्यक्रम डावलून क्रमांक ८, ९, १० व १५ यांचीच स्थळपाहणी करण्याचे निर्देश दिले.तर आता ग्रामपंचायत सचिव यांचा ०६ जानेवारी २०२५ रोजी लेखी खुलासा प्राप्त असतांना कारवाईतून बचावासाठी जुन्या तारखेत तक्रारी नंतर स्थळ पाहणी आदेश बिडीओ यांनी काढल्याचा आरोप शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केला. ठिय्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड तपासल्यानंतर हि बाब उघडकीस आली आहे.
ग्रामपंचायत सचिवांच्या पत्राने उघडले सत्य
ग्रामपंचायत सचिवांनी ६ जानेवारी २०२५ रोजी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात, या आदेशांमुळे गावात वाद निर्माण झाल्याचे नमूद केले होते. मात्र, बीडीओंनी हा पत्रव्यवहार दुर्लक्षित करून जुन्या तारखेत आदेश काढले. या घोटाळ्यामुळे इसोलीतील शेतकरी प्रकल्पासाठी मंजूर प्रस्ताव रखडले असून, प्राधान्यक्रमातील इतर लाभार्थ्यांचे हक्क डावलले गेले आहेत.शेतकऱ्यांचा संताप आणि प्रशासनावरील दबाव
शेतकरी नेते विनायक सरनाईक, देविदास कणखर, आणि अन्य शेतकऱ्यांनी या प्रकरणावर कडक भूमिका घेतली. "जोपर्यंत बीडीओवर कारवाई होत नाही आणि यापूर्वीच्या परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी दिली जात नाही, तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही," असे ठणकावत त्यांनी ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.बाकी गावांमधील विहीर मंजुरीचा प्रश्न अनुत्तरित
भोरसा, गोदरी, पांढरदेव, आमखेड, पेठ, दिवठाणा, खंडाळा, मिसाळवाडी या गावांमधील विहीर प्रस्ताव मंजूर न होण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. "ज्या गावांमध्ये प्रस्ताव सादर असूनही विहीर मंजूर होत नाही, त्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी. नव्या आराखड्याच्या कारणांमुळे शेतकरी वंचित राहतील, तर याला पंचायत समिती जबाबदार राहील," असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.घोटाळ्यामुळे उघड झालेली वस्तुस्थिती:
- मागील तारखेत आदेश काढून प्राधान्यक्रम डावलला.
- जुन्या प्रस्तावांची अंमलबजावणी न करताच नव्या लाभार्थ्यांना प्राधान्य.
- ग्रामपंचायत सचिवांच्या पत्रानंतरही अधिकाऱ्यांनी घेतलेली दुर्लक्षी भूमिका.
या प्रकरणामुळे चिखली पंचायत समितीवर शेतकऱ्यांचा प्रचंड रोष वाढला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांचे हक्क प्रस्थापित करावेत, अशी मागणी होत आहे.
0 Comments