चिखलीत आरोपींची शहरातून काढली धिंड !

दबंग ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या कृतीचे कौतुक

कायद्याच्या रक्षणासाठी चिखली पोलिसांची ठाम भूमिका



चिखली/( द बातमीवाला ) :जयस्तंभ चौक चिखली येथे मोबाईल न दिल्याच्या कारणावरून पानसेंटर चालक आणि त्याच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक करून शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढली. चिखली पोलीस ठाण्याचे दबंग ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांनी या प्रकरणात दाखवलेल्या तत्परतेचे आणि कायद्याचे रक्षण करण्याच्या दृढतेचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
 
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी उत्कर्ष माटे (वय 21, रा. चिंचपरीसर, चिखली) यांच्या पानसेंटरसमोर दि. 8 फेब्रुवारीच्या रात्री आरोपी विनोद मोहन मंजुळकर (वय 32) आणि राजू मोहन मंजुळकर (वय 23, दोघेही रा. गोरक्षणवाडी) यांनी वाद घालत त्यांच्या वडिलांना लोखंडी रॉडने गंभीर जखमी केले. फिर्यादीला देखील शिवीगाळ आणि मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांनी त्वरित पथक तयार करून आरोपींना अटक केली. कायद्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे आणि समाजात वचक निर्माण व्हावा, यासाठी आरोपींची शहरातील मुख्य रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली. या कृतीमुळे स्थानिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून गुन्हेगारीविरुद्ध कठोर भूमिका घेणाऱ्या ठाणेदार पाटील यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोकांची प्रतिक्रिया :
गावकऱ्यांनी ठाणेदार संग्राम पाटील आणि त्यांच्या पथकाच्या कृतीचे अभिनंदन करताना अशा कारवाया गुन्हेगारांना धडा देतील, अशी भावना व्यक्त केली. “कायद्याचे रक्षण करणे आणि नागरिकांचा विश्वास जिंकणे ही पोलिसांची जबाबदारी ठाणेदार पाटील यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडली आहे,” असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 109(1), 118(1), 54, 296, 351(2), आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

0 Comments