३१ मार्चला बुलडाण्यात ‘कोरडा दिवस’ ; रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आदेश
दारूबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी
बुलडाणा/( द बातमीवाला) : आगामी रमजान ईदच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात सोमवार, दि. ३१ मार्च २०२५ रोजी "कोरडा दिवस" म्हणून जाहीर करण्यात आला आहे. चंद्र दर्शनानुसार रमजान ईदचा सण एक दिवस पुढे-मागे होऊ शकतो. सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम १४२ अंतर्गत जिल्हाधिकारी यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने, परवानाकक्ष, आणि बिअर बार ३१ मार्च रोजी संपूर्ण दिवसासाठी बंद राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अनुज्ञप्तीधारकांना या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले असून, आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रमजान ईद हा मुस्लीम समाजाचा महत्त्वाचा सण असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक शांतता आणि सौहार्द कायम राखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 Comments