पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित होणार चिखलीचे ठाणेदार संग्रामसिंह पाटील
चिखली/(छोटू कांबळे ) : महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारे प्रतिष्ठित पोलीस महासंचालक पदक यंदा चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना जाहीर झाले आहे. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा मुख्यालयी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
संग्रामसिंह पाटील यांनी गेल्या 15 वर्षांमध्ये पुणे ग्रामीण, बुलढाणा, अकोला, आणि मुंबईसह विविध भागांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात ठाणेदार म्हणून त्यांनी धाड, धामणगाव बढे, साखरखेर्डा, आणि चिखली येथे स्थानिक समुदायाशी केलेल्या प्रभावी समन्वयाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. पोलिस दलात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाटील यांच्या या यशामुळे जिल्ह्यात आणि राज्यभरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे त्यांनी स्थानिक नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योगदान दिले आहे. या सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या पोलिस दलाचे नाव उंचावले आहे आणि ठाणेदार पाटील हे इतर पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
0 Comments