Award : "कर्तृत्वाला मानाचा मुजरा: संग्रामसिंह पाटील यांचा सन्मान"

चिखली ठाण्याचे ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालक पदक प्रदान

बुलढाणा जिल्ह्यातील सोहळ्यात सन्मानाने गौरवले



बुलढाणा/(छोटू कांबळे ) : महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठित पोलीस महासंचालक पदक आज १ मे  रोजी चिखली पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व खमक्या ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त बुलढाणा जिल्हा मुख्यालयात आयोजित भव्य सोहळ्यात पालकमंत्री ना. मकरंद पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.



संग्रामसिंह पाटील यांनी पोलीस दलात 15 वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर काम करत उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवली आहे. पुणे ग्रामीण, मुंबई, अकोला आणि बुलढाणा यांसारख्या विविध विभागांत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून पाटील यांनी स्थानिक समुदायाशी प्रभावी समन्वय साधत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वासार्हता निर्माण झाली आहे. याशिवाय, गुन्हेगारी नियंत्रण, सामुदायिक संवाद, आणि कायद्याचे अचूक पालन यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. या सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस दलाचे नाव उंचावले असून ठाणेदार संग्रामसिंह पाटील हे इतर पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्यात आणि राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments