"Gutkha Confiscated" : चिखलीतील आनंदनगरात 21 वर्षांचा तरुण लाखोंचा गुटखा विकताना अडकला !

"गुटखा माफियाला चिखली पोलिसांचा दणका ! लाखोंचा माल जप्त, आरोपी अटकेत"



चिखली (छोटू कांबळे ) : चिखली शहरातील आनंद नगर भागात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या इसमावर चिखली पोलिसांनी आज मोठी कारवाई केली. सदर कारवाईत पोलिसांनी ₹1,10,108/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून एक आरोपी अटक केली आहे.

चिखली पोलीस स्टेशनचे खमख्या ठाणेदार संग्रामसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनानुसार दि.५ जुलै रोजी चिखली शहरात गस्त करत असताना पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, चिखली शहरातील आनंद नगर येथील सुहास जामदार यांच्या घरात भाड्याने राहणारा इसम आपल्या खोलीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवून त्याची अवैध विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोउपनि शरद भागवतकर, पोउपनि संतोष जाधव, पोलीस अंमलदार विजय किटे, विकास देशमुख, सुनिल राजपूत, राजेश मापारी, संतोष जाधव, विनोद ब्राम्हणे, मपोहेकॉ अर्चना शिंगनाथ यांच्या पथकासह दुपारी १२.३० वाजता आनंद नगर येथील ठिकाणी छापा टाकण्यात आला. सुहास जामदार यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या योगेश जगन्नाथ नवले (वय २१, रा. सवणा, ता. चिखली, जि. बुलढाणा) याच्या खोलीची झडती घेतली असता, पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या एकूण ८ पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलीसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी योगेश नवले यास अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 123, 223, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील कलम 26(2)(iv), 59(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक मा. वी. बी. महामुनी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक संग्रामसिंह पाटील, पोउपनि शरद भागवतकर, पोउपनि संतोष जाधव, पोलीस अंमलदार विजय किटे, विकास देशमुख, सुनिल राजपूत, राजेश मापारी, संतोष जाधव, विनोद ब्राम्हणे व मपोहेकॉ अर्चना शिंगनाथ यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास चिखली पोलीस करीत असून आरोपीने सदर प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ कुठून आणला, याचा शोध घेतला जात आहे.

झडतीत जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

  1. केसरयुक्त विमल पानमसाला (288 पाऊच) – ₹53,856/-
  2. V-1 लहान तंबाखू (296 पाऊच) – ₹9,768/-
  3. विमल BIG पॅक पानमसाला (25 पाऊच) – ₹11,750/-
  4. V-1 BIG पॅक तंबाखू (25 पाऊच) – ₹750/-
  5. विमल King पॅक सुगंधित पानमसाला (138 पाऊच) – ₹27,324/-
  6. V-1 King पॅक तंबाखू (143 पाऊच) – ₹3,146/-
  7. रामनिवास पानमसाला (14 पाऊच) – ₹2,800/-
  8. RN-1 जाफरानी जर्दा (14 पाऊच) – ₹714/-

एकूण मुद्देमालाची अंदाजे किंमत : ₹1,10,108/-




Post a Comment

0 Comments