गुन्हा झाला दुपारी, चोरटे गजाआड संध्याकाळी !
"इथेच मारून टाकीन" म्हणणारे चोरटे आता खातायत तुरुंगाची हवा !
तीन तासांत जबरी चोरी उकलली ; डि.बी. पथकाची कौतुकास्पद कामगिरी !
चिखली /(छोटू कांबळे)- चिखली येथील AU Small Finance Bank समोरुन जबरीने खिशातील रोकड व दोन मोबाईल हिसकावून पळालेल्या चोरट्यांना डि.बी. पथकाने अवघ्या तीन तासांत गजाआड करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
दि. ४ जुलै रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास फिर्यादी आपल्या पत्नीसह गावी जाण्यासाठी बसस्थानकाकडे पायी जात असताना शिवाजी शाळेजवळ अचानक अडवून एका अज्ञात अॅटोमधून उतरलेल्या चोरट्याने गळा दाबत धमकी देत खिशातील ३ हजार रुपये रोख व १८,५०० रुपये किमतीचे दोन रियलमी मोबाईल हिसकावून पलायन केले होते. घटनेने घाबरलेल्या फिर्यादीच्या पत्नीची प्रकृती बिघडल्याने ते त्वरित रताळीला गेले होते आणि त्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाला. मात्र, ५ जुलै रोजी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाची सूत्रे डि.बी. पथकाच्या हाती सोपविण्यात आली.
चिखली पोलिस स्टेशनचे खमक्या ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत घटना स्थळी जाऊन माहिती संकलित केली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी हे बुलडाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तत्काळ बुलडाणा गाठून आरोपी १) शेख नुमान शेख शकील व २) फैजान खान नईम खान यांना पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफीने अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल (एकूण किमत ₹१८,५००), रोख ₹१,७६० आणि गुन्ह्यासाठी वापरलेली ₹८०,००० किंमतीची अॅटो असा एकूण ₹१,००,२६० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वात पोउपनि समाधान वडणे, सफौ राजेंद्र काळे, पोना अमोल गवई, पोकों प्रशांत धंदर, पोकॉ अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, निलेश सावळे, राहुल पायघन, मपोकॉ रुपाली उगले यांच्या संयुक्त पथकाने केली. पोलीस दलाच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे, हे पुन्हा एकदा या कारवाईतून सिद्ध झाले आहे.
0 Comments