ठाणेदार संग्राम पाटील यांना पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्र ; कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष गौरव
बुलढाणा / ( छोटू कांबळे ) : महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 23 - चिखली विधानसभा मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी खांद्यावर घेणारे ठाणेदार संग्राम पाटील यांनी आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणून नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रजासत्ताक दिनी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखली पोलीस स्टेशनने निवडणूक काळात निर्भय आणि निःपक्ष वातावरण निर्मितीसाठी विविध उपाययोजना राबवल्या. यामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकांनी 77.56 लाख रुपयांची बेकायदा रक्कम जप्त केली. याशिवाय, अवैध दारू विक्रीच्या 105 ठिकाणी धाडी टाकून मोठा दारूसाठा हस्तगत केला. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करत चिखली पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेचा ठसा उमटवला. यामुळे चिखली मतदारसंघात निवडणूक शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित पार पडली. ठाणेदार संग्राम पाटील यांच्या या परिश्रमांची दखल घेत निवडणूक काळात पोलीस विभागाने जनतेमध्ये विश्वासार्हतेची प्रतिमा उंचावली आहे.
प्रशस्तीपत्राचा सन्मान
प्रजासत्ताक दिनी आयोजित विशेष समारंभात पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ठाणेदार संग्राम पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. त्यांच्या या कामगिरीबद्दल चिखली पोलीस स्टेशनचे पथक आणि पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संग्राम पाटील यांची ही ठळक कामगिरी पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली असून, भविष्यातही अशाच सेवा प्रदान करण्यासाठी प्रेरणा ठरेल.
0 Comments