साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंचे नाव अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर झळकणार !
डेमोक्रॅटिक पार्टीच्या पुढाकाराने लो. अण्णाभाऊ साठेंचा ऐतिहासिक सन्मान
बुलढाणा/( छोटू कांबळे ) : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालये आणि विविध ठिकाणी सादर केलेल्या निवेदनांमुळे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना योग्य सन्मान मिळाला आहे. २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या प्रमुख व्यासपीठ विचारमंच प्रवेशद्वाराला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले आहे.
संमेलनाचा ऐतिहासिक सन्मान
सरहद पुणे आयोजित या साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा ऐतिहासिक ठरणार असून, अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. "साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – संघर्ष आणि निर्मिती" या विषयावर आधारित विशेष प्रदर्शनी संमेलन स्थळी सजवली जाणार आहे. या प्रदर्शनीत साठे यांच्या साहित्यिक योगदानाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांचा वारसा नव्या पिढीसमोर मांडला जाईल. तसेच, विविध साहित्यिक सत्रांत मान्यवर विचारवंत अण्णाभाऊ साठेंच्या विचारधारेला साहित्यिक आणि सामाजिक अंगाने कसे पुढे नेता येईल, यावर चर्चा करणार आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाचा महत्त्वाचा विजय
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला आहे. पक्षाचे अध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे यांनी या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे आणि पदाधिकारी ,कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, "अण्णाभाऊ साठे हे साहित्य आणि समाजाचा सेतू होते. त्यांचे विचार आजही प्रेरणादायक आहेत. या निर्णयामुळे साहित्यिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे."
0 Comments