19 मार्चला मुंबईत शेतकरी आंदोलनाचा विस्फोट ; क्रांतिकारी संघटनेची घोषणा
शेतमालाला हमीभाव नाही तर सरकारला अद्दल घडवू – रविकांत तुपकर
मुंबई ( द बातमीवाला ) : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने 19 मार्चला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला 18 मार्चपर्यंतची अल्टिमेटम दिला असून, या कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास 19 मार्चला मुंबईत मोठे आंदोलन केले जाईल, असा गंभीर इशारा दिला आहे.
तुपकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत, तर राज्यभरातील शेतकरी गाड्या भरून 19 मार्च रोजी मुंबईत धडक देतील. मात्र, आंदोलनाचे ठिकाण आणि स्वरूप अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना चळवळीशी जोडणे, शेतमालाची थेट विक्री व्यवस्था उभारणे यासह विविध उपक्रम राबविण्याचेही आवाहन केले. प्रा. यशवंत गोसावी, गजानन अहमदाबादकर, राजाभाऊ देशमुख यांच्यासह शेतकरी नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनाच्या तयारीत सहभागी झाले आहेत. सरकारच्या भूमिकेवर संपूर्ण राज्याचे लक्ष असून, 19 मार्चच्या आंदोलनाचा परिणाम काय होईल, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
जेष्ठ कार्यकर्त्याने रविकांत तुपकरांसाठी
खमिसाच्या खिशात आणली चटणी भाकरी
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पहिल्या राज्य कार्यकारणी बैठकीत राज्यभरातून ज्येष्ठ तसेच तरुण शिलेदार मोठ्या संख्येने आले होते. नगर येथील जेष्ठ कार्यकर्ते अंबादास कोरडे यांनी खास रविकांत तुपकर यांच्यासाठी प्रेमाने खमिसाच्या खिशात ठेचा भाकरीची शिदोरी आणली. कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावरच त्यांनी खिशातून भाकरीची छोटीशी पिशवी काढत रविकांत तुपकर यांच्या हाती दिली. यावेळी तुपकर गहिवरून गेले होते. त्यांनी आपल्या भाषणात गेल्या वीस वर्षापासून जिथे कुठे कार्यक्रम अथवा आंदोलन, मोर्चा असेल त्यावेळी 80 वर्षीय अंबादास कोरडे घरून निघताना माझ्यासाठी न विसरता घरून भाकरी बांधून आणतात, असे सांगितले. या प्रसंगातून शेतकरी चळवळीतील तरुणच नव्हे तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास असल्याचे दिसून आले.
0 Comments