जिल्हा काँग्रेसचा एल्गार मोर्चा ठरला लक्ष्यवेधी ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा लढा सुरुच राहणार : राहुल बोंद्रे
बुलढाणा/(छोटू कांबळे ) : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला होता. भाजपने या जाहीरनाम्याला संकल्पपत्र नाव देवून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सोयाबीनला ६ हजार रुपये भाव, एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र सरकार स्थापन होवून तीन महिन्यांपेक्षा अधिक कालवधी लोटला तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नसल्याची विदारक परिस्थिती आहे. भाजपचे संकल्पपत्र हे बळीराजासाठी मरणपत्र ठरले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी काँग्रेस पक्षाने एल्गार फुकारला असून महायुती सरकारने एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. अन्यथा कर्जमाफीसाठी काँग्रेसचा लढा सुरुच राहणार असल्याचा निर्धार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार ३ मार्च रोजी एल्गार मोर्चा धडकला. तत्पूर्वी जयस्तंभ चौकात झालेला सभेला राहुल भाऊ बोंद्रे यांनी संबोधित केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी हा प्रामाणिक कष्ट करणारा असून तो आस्मानी संकटाला तोंड देत शेतमाल उत्पादन करीत आहे. परंतु सरकारच्या सुलतानी संकटाने तो पुरता नागवला जात आहे. सोयाबीन, तुर, ज्वारी, मका, कापुस या पीकांना शासनाचे हमी भाव सुध्दा मिळत नाही. केंद्र व राज्य सरकारे हमी भाव जाहीर करतात, परंतु त्या भावाने शासन खरेदी करीत नाही. शेतमाल तयार होण्याचे पुर्वीच मोदी सरकार परदेशातुन शेतमाल आयात करते. त्यामुळे देशात शेतीमालाचे भाव पाडले जातात, त्यामुळे हे सरकारच शेतकऱ्यांना मारण्याचे काम करीत आहे म्हणून या शेतकरी मोर्चाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात येत असल्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले. याप्रसंगी माजी आमदार राजेश एकडे, श्यामभाऊ उमाळकर, धनंजय देशमुख, लक्ष्मणराव घुमरे, रशीद खा जमादार, अनिकेत मापारी,अशोक पडघान, अंबादास बाठे, मंगलाताई पाटील, आशाताई गौंड, विजयसिंग राजपूत, सभापती सुभाष पैसोडे, सभापती भगवान धांडे, कार्याध्यक्ष तथा उपसभापती नंदू शिंदे, खरेदी विक्री चे अध्यक्ष ईश्वराव इंगळे,सुनिल तायडे, प्रकाश पाटील अवचार, सतिष मेहेंद्रे, सुनिल सपकाळ, अॅड. विजय सावळे, अॅड अनंतराव वानखेडे, डिगांबर मवाळ, चित्रांगण खंडारे,साहेबराव पाटोळे, डाॅ. सतेंद्र भुसारी, डाॅ. इसरार यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
शिंदे – फडणवीस – अजित पवार – मोदी हे सारेच आहे शेतकरी विरोधी
एल्गार मोर्चाला गांधी भवन जयस्तंभ चौक येथून सुरवात झाली त्यानंतर बाजारपेठ मुख्य मार्ग, जनता चौक, कारंजा चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ऱाज्यपालांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तर मोर्चेकऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकरी- कष्टकरी एकजूटीचा विजय असो, उद्योगपती तुपाशी, बळीराजा उपाशी.. शिंदे – फडणवीस – अजित पवार – मोदी हे सारेच आहे शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा मिळालाच पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
या आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
1. एक महिन्याचे आत शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यात यावी व मे महिन्यात शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
2. कृषी मूल्य आयोगाचे शिफारसीनुसार सोयाबीनला किमान प्रति क्वि. रू. ७,०००/- तुरीला प्रती क्विं. रू. ९,०००/- ज्वारीला रू.४,०००/-, कापुस पीकाला प्रति क्विं. रू. ९,०००/- मका पीकाला प्रती क्विं. रू. ३,०००/-, हरभरा प्रती क्विं. रू. ७,०००/- याप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारीत भाव पुढील हंगामासाठी जाहीर करण्यात यावा.
3. परेदशातून आयात केल्या जाणाऱ्या शेती मालावर 40% आयात कर लावण्यात यावा, शेतकऱ्यांना किमान केंद्राच्या (एम.एस.पी.) हमी दराने भाव मिळावा, कृषी मालाच्या हमी भावाची किंमत ही कृषी मूल्य आयोगाने उत्पादन खर्चावर आधारीत ज्या नविन शिफारसी केल्या आहेत. त्याप्रमाणे शेतमालाच्या किमती वाढवून देण्यात याव्या.
4. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यात यावा. व ती रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येवू नये.
5. जिल्ह्यात दर दिवसाला शेतकरी आत्महत्या होत आहेत, याची शासनाने अतिशय संवेदनशीलतेने नोंद घेवून या जिल्ह्याचा आर्थीक विकास आराखडा तयार करावा.
6. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबाची पुढील जबाबदारी शासनाने स्विकारावी.
7. शेतकऱ्यांना दिवसाचे १० तास विजेचा पुरवठा अखंडीतपणे करण्यात यावा.
महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यात एकाचवेळी आंदोलन
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी पदभार स्विकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यात एकाचवेळी आंदोलन करुन शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्रस्थानी आणण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील सर्व शेतकरी प्रत्येक तालुक्यात अखिल भारतीय काँग्रेसच्या झेंड्याखाली रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशाराही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल बोंद्रे यांनी दिला आहे.
सदर आंदोलन प्रसंगी सरस्वतीताई खाचने, राजेश मापारी, दत्ता काकस, गजानन मामलकर, राजू पाटील, बंडूभाउ चौधरी, अविनाश उमरकर, तेजराव मारोडे, राजेश्वर देशमुख, विजय काटोले, समाधान सुपेकर, देवानंद पवार, पंकज हजारी, शेख समद, शैलेश खेडकर, प्राचार्य निलेश गावंडे, कलीम खान, विश्वदिप पडोळ, शिवराज पाटील, किशोर भोसले, प्रमोद चिंचोळकर, ज्ञानेश्वर चिभडे, महेंद्र गवई, श्रीकृष्ण खराटे, शेरसिंग रबडे, बिदुसिंह इंगळे, संताराम तायडे, अॅड भलेराव,प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर सुरोशे, अजय ताठे, गणेशसिंह जाधव, बाजीराव पाटील, एकनाथ चव्हाण, वसंतराव देशमुख, प्रकाश राठोड, प्रकाश चव्हाण, वसंतराव देशमुख, संजय सुलकर, प्रदिप देशमुख, प्रकाश धुमाळ, सोनू कुळे ,बंडूभाउ कार्वाघे, साहेबराव चव्हाण, नंदुभाउ बोरे, एजाज मंत्री आदी उपस्थिती होती.
0 Comments