अघोषित लोडशेडिंगविरोधात चिखलीत युवासेनेचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
चिखली/( छोटू कांबळे ) - चिखली शहर आणि तालुक्यातील अघोषित लोडशेडिंगच्या समस्यांवर आवाज उठवत शिवसेना आणि युवासेनेने महावितरणच्या कार्यप्रणालीला चांगलेच धारेवर धरले. सोमवारी, 3 मार्च रोजी, महावितरणच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अधिकार्यांना घेराव घालण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कर्हाडे आणि शहरप्रमुख आनंद उर्फ बंटी गैची यांनी केले.
शहर आणि तालुक्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंगमुळे जनतेचा संताप शिगेला पोहोचला आहे. एका वार्डाची लाईन दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित करणे, गावाची लाईन दुरुस्त करताना संपूर्ण विभाग अंधारात टाकणे, तसेच अवास्तव वीजबिले पाठविणे या समस्यांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. वीज नसल्याने लहान मुलांची तब्येत बिघडत आहे, पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, तर येत्या सैलानीबाबा आणि रेणुकामाता यात्रेच्या पार्श्वभूमीवर अडचणी अधिकच गडद झाल्या आहेत. युवासेनेने महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना या समस्यांचा जाब विचारला. आंदोलनाच्या दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नंदु कर्हाडे, आनंद गैची, प्रितम गैची, अशोक राजपूत, समाधान जाधव, रवी पेटकर, शंभु गाडेकर, अनिल जावरे, गणेश कुडके, बंटी कपूर, मदत आकाळ, राहुल वरवंडे, बंडू गारडे, अरुण सुरडकर, पिंटू गायकवाड, सतनामसिंग वधवा, सचिन जोशी, शेख बबलू, बाबूभाई, दिनेश गैची, प्रथमेश गैची, रोशन खान, प्रणव सोनुने, संजय राऊत, सोनू गुजर, बंटी माळोदे, काझीमभाई, अतुल मगर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. आंदोलनाच्या माध्यमातून युवासेनेने जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचा पाऊल उचलल्याचे शहरभरात चर्चिले जात आहे.
0 Comments