लाचखोरीचा कळस ! न्यायालयात 1 लाखाची लाच घेताना वकील रंगेहात पकडला

मेहकरमध्ये सरकारी वकिलाचा लाचखोरीचा पर्दाफाश ; एक लाख घेताना वाशिम एसीबीच्या सापळ्यात अडकला !



बुलढाणा /( छोटू कांबळे ): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी अभियोक्ता व सहायक सरकारी वकील जनार्दन मनोहर बोदडे (रा.खामगाव वय ६१) हे तक्रारदाराकडून एक लाखाची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ अडकले.

या कारवाई नंतर मेहकरच्या न्यायालय परिसरात खळबळ उडाली. या कारवाईबाबत एसीबीच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, डोणगांव पो.स्टे.येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होईल अशी बाजू न्यायालयात मांडण्यासाठी सहायक सरकारी अभियोक्ता व सहायक सरकारी वकील जनार्मदन  बोदडे यांनी तक्रारदाराला तीन लाख रूपयांची लाच मागीतली होती. तडजोडीअंती वकील बोदडे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराला अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(एसीबी)वाशिम येथील पथकाने आज शुक्रवार दि.२८ फेब्रूवारीला सकाळी ११ वाजता मेहकर न्यायालय परिसरात सापळा रचला. लाचेचा पहिला हप्ता एक लाख रुपये स्विकारताना सहायक सरकारी वकील जनार्दन बोदडे यांना एसीबी वाशिमच्या पथकाने रंगेहाथ पकडले व ताब्यात घेतले. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८कलम ७नुसार मेहकर पो.स्टे.मध्ये आरोपी वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची प्रभावी कारवाई

तक्रारदाराने डोणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या कारवाईत अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप आणि अपर अधीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, हवालदार विनोद मारकंडे, आसिफ शेख, योगेश खोटे, रवींद्र घरत आणि मिलिंद चन्नकेशला यांचा समावेश होता.

कायद्याच्या कक्षेत कारवाई

या प्रकरणी बोदडे यांच्या विरोधात मेहकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच स्वीकारण्याच्या या प्रकाराने न्यायालयीन व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments