आजपासून यात्रा महोत्सवास प्रारंभ ; १८ मार्चला निघणार बाबा सैलानी संदल
सैलानी /( द बातमीवाला ) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रा महोत्सवाला आज १३ मार्च रोजी होळीच्या दिवसांपासून प्रारंभ होत आहे. होळीचे विशेष आकर्षण असलेला बाबांचा संदल १८ मार्च रोजी निघणार आहे. आज पंचवीस ते तीस ट्रक भरतील एवढ्या लाखो नारळांची होळी पेटणार आहे. या होळीसाठी दोन दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी जमू लागली आहे.
या होळीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडते. भाविक या ठिकाणी नवस बोलतात, तर असंख्य भक्तगण नवसपूर्ती करतात. शेकडो कोंबडांचाही या होळीत बळी दिला जातो. मुक्या जीवांचा बळी दिला जावू नये, याची प्रशासनासह पोलीस काळजी घेणार आहेत. भाविकांमध्ये पाळली जाणारी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृतीदेखील केली जात आहे.
दर्याच्या बाजूने काही अंतरावर शेतात होळी पेटविण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. गुरांची कत्तल होऊ नये, यासाठी यंत्रणेने सतर्क राहावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यात्रेच्या पाहणीदरम्यान दिले. नारळाच्या होळीवेळी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. होळी सणाला अनिष्ट प्रथा टाळाव्यात. सैलानी यात्रा उत्सवात नागरिकांनी अंधविश्वास न बाळगता श्रद्धा ठेवावी तसेच संपूर्ण यात्रेत शांतता टिकून राहण्यासाठी खबरदारी घ्यावी. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन विविध बाबींवर जनजागृती करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ . किरण पाटील यांनी केले.
अंगारा म्हणून राख घेण्यासाठीही गर्दी
काळे बाहुल, लिंबू, बिबे, सूया, खिळ्यांनी टाचलेले नारळ मनोरुग्णाच्या अंगाखांद्यावरून ओवाळून टाकल्यास व्याधी दूर होते, असा भाविकांचा समज आहे. त्यामुळे या होळीमध्ये अशी नारळे टाकण्यासाठी चढाओढ लागते. दुसऱ्या दिवशी होळीतील राखदेखील अंगारा म्हणून कपाळी आणि अंगाला लावली जाते. त्यासाठीही भाविक गर्दी करतात.
चोख पोलीस बंदोबस्त
होळीभोवती चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण यात्रेत जागोजागी पोलीस बंदोबस्त आहे. तात्पुरती पोलीस छावणीही उभारण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाने तात्पुरती बसस्थानके उभारली आहेत. विविध आगारांमधून सैलानी येथे विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
0 Comments