पोलिस कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
लाच प्रकरणात बिट जमादार अडकल्याने पोलिस विभागात खळबळ
बुलढाणा/( द बातमीवाला ) : अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी), बुलढाणा यांनी पोलिस विभागातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. आरोपी पोलीस कर्मचारी अनिल विठ्ठल कुकडे (वय ४५ वर्ष), पोलीस हवालदार (ब.नं. ६५४), बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
तक्रारदाराने फसवणुकीच्या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे अर्ज केला होता. या प्रकरणी बिट जमादार कुकडे यांनी २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १५,०००/- रुपये ठरली. त्यापैकी ५,०००/- रुपये आज कारंजा चौकातील दवे टी सेंटर येथे घेताना कुकडे यांना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने पकडले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाच मागणी पडताळणीसाठी १६ एप्रिल २०२५ रोजी सापळा रचण्यात आला होता. आरोपी कुकडे यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना पंचांसमोर अटक करण्यात आली. आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मारुती जगताप आणि अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे आणि त्यांच्या पथकाने केली.
सार्वजनिक आवाहन
शासकीय लोकसेवकाकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी अॅन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२५४८ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments