रविदास नगरातील मातंगपुरा वस्तीत नागरिकांना मूलभूत सुविधांचा तुटवडा !
"पावसाळ्यात चिखल, गटार आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचा जीव त्रस्त"
"लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष ; "आगामी निवडणुकांवर होणार परिणाम"
चिखली : (द बातमीवाला ) :- चिखली शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील रविदास नगरातील मातंगपुरा वस्तीतील नागरिक गेल्या ४० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. "आमच्या वस्तीत रस्ता नाही, नाली नाही, नळपाणीपुरवठा पाइपलाइन नाही… मग आम्हाला नागरिक समजले जाते का ?" असा संतप्त सवाल येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत.
शहरात अनेक ठिकाणी आधीच रस्ते झाले असूनसुद्धा तेथे पुन्हा पुन्हा रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण केले जात आहे. मात्र, मातंगपुरा वस्तीमध्ये अद्याप एकदाही रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे या भागात लोक राहत नाहीत का, असा कडवट प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत या संदर्भात नागरिकांनी वारंवार निवेदन देऊन मागणी केली, तरीही आजपर्यंत ही मागणी मंजूर झालेली नाही. परिणामी, पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे रहिवाशांचे हाल होत असून, दिवसा-ढवळ्या गटार व दुर्गंधीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर या दुर्लक्षाचा परिणाम दिसून येईल, असे स्पष्ट संकेत नागरिकांनी दिले आहेत. "दलीत वस्तीत विकासाची गंगा कधी पोहोचणार ?" असा थेट प्रश्न करून नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
0 Comments