रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची नागरिकांना सतर्कतेची विनंती ; चिखली नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन !
नदीकाठावर राहणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी
![]() |
[ फोटो फाईल...] |
चिखली (छोटू कांबळे/द बातमीवाला): – बुलढाणा जिल्ह्यात, चिखली तालुक्यात व शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आणि दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर चिखली नगरपरिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रशांत बिडगर यांनी केले आहे.
नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गोदरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून त्याचे पाणी जामवंती नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून, चिखली शहरातील नदीकाठच्या परिसरात पाणी शिरण्याचा धोका नाकारता येत नाही. या संभाव्य पुरस्थितीमुळे नागरिकांची जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नदीकाठावरील सर्व रहिवाशांनी तात्काळ सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे राहण्याची सोय नाही अशा नागरिकांसाठी नगरपरिषदेकडून माळी भवन येथे निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी वीजेचे खांब, विद्युत टॉवर किंवा इतर वीज यंत्रणेजवळ थांबू नये व त्यांना स्पर्श करणे टाळावे, असेही स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे. नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या या आवाहनाची सर्वांनी गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रशांत बिडगर यांनी केले आहे.
0 Comments