🚨 Exclusive : 💥 “आकड्यांचा बाजार” तापला ; वरली मटका पुन्हा मैदानात!

चिखलीत वरली मटका पुन्हा जोमात !

अवैध जुगाराचे डोके वर ; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी





चिखली /( द बातमीवाला )- चिखली शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वरली मटक्याने पुन्हा एकदा बेधडकपणे डोके वर काढले आहे. काही महिन्यांपूर्वी बंद पडलेले  वरली मटका,जुगार अड्डे आता पुन्हा जोमात सुरू झाल्याची चर्चा गावोगावी रंगत आहे. आकड्यांची चिठ्ठी, एजंटांची वर्दळ आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले व्यवहार यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
    बुलढाणा जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कार्यभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांच्या धाकामुळे वरली मटका, जुगार अड्डे आणि इतर बेकायदेशीर व्यवहारांना मोठा आळा बसला होता. मात्र, काही दिवसांची शांतता लाभल्यानंतर पुन्हा एकदा या अवैध वरली जुगाराने डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे.
वरली मटक्याच्या जाळ्यात अनेक तरुण अडकत असून, कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेले आकड्यांचे व्यवहार पाहून सामान्य नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. “जुगाराच्या पायी संसाराची राख रांगोळी होतेय, आणि संबंधित यंत्रणा गप्प का ?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशेष मोहीम राबवावी, तसेच अवैध जुगार पूर्णपणे बंद करण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. चिखलीत वाढणाऱ्या या जुगारसाखळीला लगाम लागणार की पुन्हा एकदा सर्व काही ‘मॅनेज’ होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments