चिखलीत बिनधास्त जुगाराचे साम्राज्य ; शहरातील शांतीचा अंत सुरू !
जुगाराने उध्वस्त होतायत तरुणाई आणि कुटुंबं ; प्रशासनाचे डोळेझाक धोरण !
चिखली /( छोटू कांबळे ) : चिखली ही जिल्ह्याची राजकीय राजधानी व मुख्य बाजारपेठ केंद्र मानले जात असले, तरी सध्या हे शहर वरली मटका, चक्री, आणि खुलेआम जुगार अड्ड्यांसाठी कुप्रसिद्ध ठरत आहे. शहरातील आठवडी बाजार परिसर आणि जवळच्या गल्लीबोळांमध्ये खुलेआम वरली मटका, चक्री व जुगाराचे खेळ खेळले जात आहेत. या प्रकारामुळे शहरातील तरुणाई देशोधडीला लागत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
चिखली शहरातील विविध भागांमध्ये खुलेआम वरली मटका, चक्री,जुगार खेळाचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. विशेषतः आठवडी बाजार परिसरातील गल्लीबोळ हे जुगारासाठी प्रसिद्ध झाले आहेत. येथे लहान-मोठ्या गटांनी जुगार खेळण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात. पैशांच्या नशेत बुडालेल्या या तरुणांनी कामधंदा सोडून आयुष्य उध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. जुगार खेळण्याच्या सवयीमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. जुगाराच्या नशेमुळे अनेक तरुण कर्जबाजारी होत आहेत, परिणामी घरातील आर्थिक जबाबदाऱ्या पार कोसळत आहेत. अनेक संसार उध्वस्त झाले असून कुटुंबातील सदस्यांवर मोठा ताण आला आहे. आठवडी बाजार परिसरातच अवैध धंद्यांचे व्यवसाय थाटले असल्याने परिसरात महिलांना रोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अड्ड्यांवर गर्दी जमल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा गैरवर्तन आणि छेडछाडीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी सुद्धा आहेत. महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे त्यांनी बाजारात जाणेही कमी केले आहे. या समस्येकडे प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे. पोलीस विभागाकडून काही ठिकाणी कारवाई केली गेली असली, तरी ती तोकडी असून जुगार खेळ थांबलेले नाहीत. अनेकदा काही राजकीय हस्तक्षेपांमुळे अशा अड्ड्यांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. तरी चिखलीतील जुगार अड्ड्यांना त्वरित रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
अवैध धंद्यांवर प्रशासन गप्प !
चिखली शहरात वरली मटका, चक्री, जुगार अड्ड्यांचा हैदोस सुरू असून, या अवैध धंद्यांमुळे शहरातील तरुणाई देशोधडीला लागत आहे. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, पण प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. शहरातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून, आठवडी बाजार परिसरात गैरवर्तन आणि छेडछाडीच्या घटनांत वाढ झाली आहे. यामुळे महिलांनी बाजारात जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी केली आहे. जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर चिखलीतील परिस्थिती आणखी बिकट होईल, असा इशारा संतप्त नागरिक देत आहेत. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या धंद्यांवर बंदी घालण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, हीच लोकांची मागणी आहे.
0 Comments